गुरुवार, १५ मे, २०२५

 

निसर्ग आपल्या आवती-भोवती 

घोस्ट ट्री/ भुतियाचे झाड


पानझडी वनात प्रमुख्याने ही झाडे आढळून येतात. आंबा घाट उतरून गणपती पुळ्याला जाताना दाभोळ सोडले की, घाट चढताना घाटातच उजव्या बाजूला एक मोठ्ठे झाड आहे. उन्हाळ्यात आवर्जून त्याकडे लक्ष जातेच. पानझडी वनात ही झाडे मुबलक प्रमाणात आढळून येतात. ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पाने गळून पडायला सुरुवात होते तर मे, जून महिन्यापासून नवी पालवी फुटते. जेव्हा या झाडांची पाने गळून पडत असतात, त्याचवेळी झाडाच्या खोडावरील पातळ साल (छिलके) निघून जात असतात. त्यामुळे झाडांचा रंग एकदम पांढरा होऊ लागतो. तो एव्हढा पांढरा होतो की, जणू कुणी ती झाडे रंगवली असावीत असे वाटते. अशी पर्णहीन पांढरी फेक झाडे जंगलात इतर झाडापेक्षा खूपच लक्ष वेधून घेतात.

बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण झाडे पांढरी होत असल्याने वनात एखादी नग्न तरुणी उभी असल्याचा भास निर्माण होतो. म्हणून तर या झाडांचा उल्लेख The nude young lady in a forest (द न्यूड यंग लेडी इन फॉरेस्ट) असा आढळून येतो.

या झाडांना नर, मादी व उभयान्वयी अशा तिन्ही प्रकारची फुले येतात. फुलांचा उपयोग कामोत्तेजना वाढवण्यासाठी तर फळांच्या बियांचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. पावसाळ्यात ही झाडे तर झाडाप्रमाणे दिसतात. वेगळेपण लक्षात येत नाही. उन्हाळ्यात मात्र त्यांचे हे उघडे सौंदर्य लक्षात राहण्यासारखेच असते.....



(प्रदीप रवलेकर, कराड,)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा