बुधवार, १ जुलै, २०२६

 निसर्ग आपल्या आवती-भोवती.......उंबर आणि उंबराचे फुल.......

आमच्या शाळेच्या रस्त्याला लागून उंबराचे एक झाड होते. फळांनी नेहमी गच्च भरलेले असायचे. झाडावर फळे खाण्यासाठी पक्षांचा नेहमीच वावर असायचा.... भरपूर पिकून फळे खाली पडायची. आम्ही ती आधी मधी खात असू. उंबराचे फुल बैलगाडीच्या चाकाएवढे असते. ते मध्यरात्री उमलते आणि खूप पुण्यवान माणसालाच दिसते. असे नेहमी मित्रांच्या कडून ऐकायला मिळायचे. आपण पुण्यवान आहोत की नाही हे बघण्यासाठी तर नेहमीच त्या झाडावर नजर जायची. पण फुल कधी दिसले नाही. मुळातच उंबराचे फळ हेच उंबराचे फुल असते हे समजायला बरीच वर्षे गेली.

आज याची आठवण यायला कारण म्हणजे शाळेत उंबराचे झाड लावले. उंबराच्या झाडाबरोबर त्याची ओळख व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच......


पक्षी उंबराची फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो. उंबराचे फळ म्हणजे त्या वनस्पतीचा पुष्पसमूहच असतो. हे फळ कापल्यास ही फुले दिसतात. त्यात नरफुले, मादीफुले आणि नपुंसक (वांझोटी) फुले अशी तीन प्रकारची फुले असतात.
ब्लास्टोफॅगा सेनेस या चिलटा एवढ्या कीटकांची मादी अंडी घालण्यासाठी उंबराच्या खालच्या बाजूने आत प्रवेश करते आणि नपुंसक फुलामध्ये आपली अंडी घालते. ज्या छिद्रातून ती आत शिरते, त्याच्या तोंडाशी आतील बाजूला वाळलेली अनेक ताठ कुसळे असल्याने ती एकदा आत गेली की, तेथून ती बाहेर पडू शकत नाही. ती आतच मरून जाते. यावेळी तिच्या अंगावर दुसऱ्या फुलाकडून येताना माखले गेलेले असंख्य परागकण असतात. ते आतील फुलांवर पडून फळ निर्मिती होते.

काही दिवस गेल्यावर कीटकाच्या अंड्यांतून पिले बाहेर पडतात व वाढतात. त्यांच्या नर-माद्यांचा समागम होऊन नर मरतात. फलित माद्या फळातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. याच वेळी त्यांच्या अंगावर नरफुलातील परागकण माखले जातात. उंबर पिकू लागल्याने वरच्या छिद्राजवळील कुसळे मऊ झालेली असतात. माद्या तेथून सहज बाहेर पडतात आणि अंडी घालण्यासाठी दुसऱ्या कच्च्या उंबराकडे वळतात. अशा प्रकारे हे चक्र चालूच राहते.


ब्लास्टोफॅगा सेनेस हा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्या सहजीवनातून कीटकांचे प्रजनन आणि वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. हे चक्र निरंतर सुरूच राहते.
ही झाडे असणाऱ्या ठिकाणी जमिनीत पाण्याचा साठा आढळतो. शिवाय ही झाडे २४ तास प्राणवायू हवेत सोडतात. सदापर्णी वृक्ष आहे. म्हणून तर अशी झाडे लावायला हवीत, ती वाढवायला हवीत.
(प्रदीप रवलेकर,कराड)

1 टिप्पणी: