शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

 प्रवास वर्णन 

नाणेघाट....प्राचीन व्यापारी मार्ग...

महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या नाणेघाटाला पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. या वर्षी सह्याद्रीतील काही घाट नजरेत घ्यायचे म्हणून नाणेघाट चा प्लॅन केला. या सुंदर ठिकाणाची तुम्हालाही सैर घडावी म्हणून हा लेखन प्रपंच.

पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. पूर्वीच्या प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या भडोच, सोपारा,कल्याण व चेऊल या बंदरांत येत असे. या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीमार्गे देशावर होत होती. याशिवाय पठारावरील लोक देशावरून कोकणात ये-जा करण्यासाठी या घाट रस्त्याचा उपयोग करीत असत. त्याकाळी सोपारा व कल्याण येथून पठारावर माल वहातुक करण्यास नाणेघाट जवळचा व सोयीचा मार्ग होता. नाणेघाटापासून पुढे हा मार्ग देशावर जुन्नर-नगर-नेवासा-पैठण असा होता.

घाटमाथ्यावर पठार असून तेथे एक भव्य कोरीव दगडी रांजण आहे. या रांजणात पूर्वी जकातीची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती तेथील एका स्थानिकाने सांगितली.
नाणेघाट येथील खिंडमार्गातील मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या मूर्ती कोरलेल्या आढळून येतात. भग्न झालेल्या मूर्तीच्या बाजूला त्यांची नावे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या यज्ञांचा व दानांचा शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे. त्यातील बरीचशी अक्षरे नष्ट झालेली दिसून आली.
प्राचीन काळातील खडतर मार्ग म्हणून आज हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. बाजूला उलटे धबधबे आहेत. ते हि पाहण्यासारखे आहेतच. शिवाय खिंडमार्गाजवळील नानीचा अंगठा निसर्गाचा आस्वाद घेण्यासारखा पाँईट आहे. जवळच जीवधन किल्ला आहे.


मार्ग- कराड- सातारा-पुणे-चाकण-मंचर-नारायणगाव-जुन्नर-नाणेघाट 285 कि.मी. एकेरी



प्रदीप रवलेकर, कराड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा