प्रवास वर्णन
सांधण व्हॅली- निसर्गाचा अदभूत चमत्कार
पावसाळ्यातील ट्रेक मध्ये प्रामुख्याने गड किल्ले यांची भटकंती ठरलेली. या वेळी थोडी वेगळी वाट करून अहमदनगर जिल्ह्यांतील साम्रद गाव गाठले. गाव म्हणजे कसले अजूनही एखादा आदिवासी पाडाच. सह्याद्रीच्या खुशीत बसलेले हे गाव नजीकच्या सांधण दरीमुळे जगाच्या नकाशावर आलेले. भूगर्भातील हालचालीमुळे येथील पठाराला भेग पडली आहे. हीच सांधण व्हॅली. आशिया खंडातील दोन नंबरची सर्वात खोल दरी म्हणून ओळखली जाते. हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे येत असतात. मात्र मला हे ठिकाण पाहण्यासाठी २०२१ सालाची वाट पहावी लागली.
श्रावण महिना नसला तरी सद्या वातावरण खूप आल्हाददायक आहे. याच संधीचा फायदा घेवून सांधण व्हॅलीच्या दर्शनाला आम्ही बाहेर पडलो. दुपारी एक दीड वाजता या ठिकाणी पोहचलो. पावसाळा असूनही उन्हाचा तडाका जाणवत होता. दहा ते पंधरा मिनीटांचे अंतर चालून काही पॉईंट बघून घेतले. येथील निसर्गाचे अद्भुतरम्य रूप पाहण्यासारखे आहे.
उलटे धबधबे व खोल सरळ रेषेतील सह्याद्रीचे कडे डोळ्याचे पारणे फेडतात. जवळच असलेली सांधण व्हॅली वरून पाहताना काळजाचा ठोका चुकतोय की काय? अशी क्षणभर भीती मनात येवून जातेच. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पावसाळ्यात बंद असल्याने दरीतून प्रवास करता आला नाही. मात्र काही अंतरापर्यंत गार्डच्या मदतीने जाता आले. रॅप्लिंग काही अंशी चालू होते. मनसोक्त फोटो सेशन सुरु असताना उन्हाने पूर्णपणे अंगाची लाही लाही झाली होती, परंतु दरीतील थंड पाण्याने थकवा कुठे निघून गेला ते समजलेच नाही. दरीतील थंड वातावरण मनाला ताजे करून गेले. भर दुपारी दरीतील काळोख अनुभवता आला.
सुमारे दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेल्या या दरीतील अनेक धबधबे नजरेत साठवून आम्ही परतीचा मार्ग धरला. रस्त्यातील हॉटेलमध्ये घरगुती जेवण करून भंडारदरा रस्ता धरला. बरोबर नेहमीचीच पत्रकारांची टीम होतीच.
कराड- पुणे- चाकण- राजगुरूनगर- मंचर- नारायणगाव- कोतूळ- भांडारदरा- उडदावणे-साम्रद..350 कि.मी एकेरी
प्रदीप रवलेकर, कराड



खूप सुंदर वर्णन व निसर्ग
उत्तर द्याहटवा