'Freeedu: "एक नवी शैक्षणिक सुरुवात....!"

शुक्रवार, १९ जून, २०२६

 

निसर्ग आपल्या आवती भवती.......पैसा किडा / वाणी किडा

पैसा किडा त्यालाच वाणी किडा (Millipede) म्हणून आपण ओळखतो. पावसाळ्यात दिसणारे हे किडे इतर वेळी जातात कुठे ? खातात काय? आणि हे नेमके पावसाळ्यातच कुठून येतात. असे अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांचा वेध....
पावसाळ्यात हे आपल्या परिसरात बागेत शाळेभोवती हमखास आढळून येतात......

पैसा किडा एक ते दोन वर्ष जगतो. मादी सुमारे 150 ते 200 अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सर्व पिल्ले एकत्रित प्रवासाला निघतात. एकत्रित जण्याने शत्रूला एवढा मोठ्ठा कसला प्राणी म्हणून सहज चकवा देता येतो. त्यामुळे त्यांना काठीने विसकटले तरी ते पुन्हा पुन्हा एकत्रित येतात. 20 ते 21 दिवस एकत्रित राहिल्यानंतर हे सर्व किडे आपआपल्या मार्गाने इतरत्र पसरतात. कुजलेला पाला-पाचोळा व बारीक बारीक वनस्पतीची लव हे त्यांचे अन्न. हे निरुपद्रवी असल्याने सहसा कोणी त्यांना मारत नाही.


हे किडे सुरवातीच्या काळात एकत्रित राहून मार्गक्रमण करत असतात.....

मात्र काही पक्षी, कीटक त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यामुळे सुरवातीला एवढ्या मोठ्या संख्येने दिसणारे मोठ्ठे झाल्यावर खूपच कमी दिसून येतात. संकट येताच शत्रू पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शरीराची गुंडाळी करून घेतात. त्यांचा हा आकार पैश्या सारखा असल्याने त्याला पैसा किडा म्हणून ओळखतात.
विशिष्ठ प्रकारचा वास सोडून शत्रूपासून बचाव करण्याची नैसर्गिक देणगी त्यांना मिळालेली असते. हे किडे आकाराने मोठ्ठे झाल्यावर त्यांच्या अंगावरचे कवच कठीण व चमदार बनते. जे काही जिवंत राहतात. ते अंडी घालून पुढचा वंश अबाधित ठेवतात. त्यामुळे ते पुढच्या पावसाळ्यातच दृष्टीस पडतात यांना 60 ते 70 पायांच्या जोड्या असतात. कोरडवाहु शेती असणार्या भागात यांचे प्रमाण जास्त असते.

शरीराची गुंडाळी करण्याच्या त्याच्या पद्तीमुळे त्याला पैसा किडा म्हणून आम्हाला त्याची पहिली ओळख झाली

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा घरातील मोटठी माणसं सांगायची या कीड्याचे पैसे होतात म्हणून. मग आम्ही त्यांना मारून पुरून ठेवेत असू. ढीगभर किडे पुरूनही चिमुटभर पैसा मिळाला नाही. त्यामुळे आज त्यांना मारलेल्याचे दुख आहेच. आणि याच कुतुहलातून अनेक ठिकाणावरून जमा केलेली माहिती आपल्यासाठी. या महितीसाठी कराडचे प्रसिद्ध प्राणी शास्त्रज्ञ डॉ. एस एस पाटील यांची मदत झाली...
(प्रदीप रवलेकर, कराड

गुरुवार, १९ मार्च, २०२६

                           

                               भिंतीबाहेरची शाळा....

                 
                          पक्षांसाठी पाणी व चारा देऊन निसर्गाशी नाते जोडण्याचे प्रयत्न ........

         भिंतीबाहेरची शाळा....

               वृक्षतोड व जंगलाची मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने प्राणी- पक्षांचे अधिवास कमी होत आहेत. याचा एकूणच त्यांच्या जीवनावर परिणाम होऊन त्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येते. म्हणून आम्ही दरवर्षी पक्षासाठी घरटी तयार करणे, अन्न व पाण्याची सोय करणे. मोकळ्या जागेत बिया पुरणे, आणि त्या परिसराची स्वच्छता हे उपक्रम गेल्या तीन वर्षापासून राबवित आहोत.

 

                 

             प्रामुख्याने शाळा बालसुधारगृह (मलकापुर) व आगाशिव डोंगर (जखिणवाडी) परिसर हे आमचे कार्यक्षेत्र. प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून पाणी साठवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठीची भांडी तयार केली जातात. नारळाच्या कवट्या, पोकळ बांबूचे अर्धे तुकडे, प्लास्टिकचे कॅन यांचा उपयोग केला जातो. गेल्या वर्षी तब्बल 9 पोती प्लॅस्टिक आगाशिव डोंगराच्या पायथ्यापासून गोळा झाले होते. वर्षभरातील मुलांनी खाल्लेल्या फळातील बियांचे झालेले संकलन मोकळ्या माळा पर्यंत येवून पोहचते. आणि एक एक बी मातीचा आसरा घेते. तेव्हाच मुलांची मातीशी असणारी नाळ जोडली जाते. आणि शिक्षण म्हणजे तरी दुसरे तिसरे काय...? 

 

                 
                        आगाशिव लेण्यांच्या पायथ्याला दरवर्षी कचरा निर्मुलन उपक्रम 

                            चार भिंतीच्या आतील शिक्षण चार भिंतीच्या बाहेर आणून परिसर आणि मुलांच्या   जगण्याशी त्याची सांगड घालण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. प्रयत्न लहान, मुले ही  लहान पण परिसराशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करून त्याकडे मुलांच्या पाहण्याचा दृष्टीकोण सकारात्मक बनविणे हे स्वप्न मोठ्ठे. कारण आम्हाला माहिती आहे,
 स्वप्नातून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तीत्वात आहे. फक्त हवी ती जिद्द आणि चिकाटी।

                                  (प्रदीप रवलेकर, कराड)

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

 प्रवास वर्णन 

नाणेघाट....प्राचीन व्यापारी मार्ग...

महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या नाणेघाटाला पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. या वर्षी सह्याद्रीतील काही घाट नजरेत घ्यायचे म्हणून नाणेघाट चा प्लॅन केला. या सुंदर ठिकाणाची तुम्हालाही सैर घडावी म्हणून हा लेखन प्रपंच.

पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. पूर्वीच्या प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या भडोच, सोपारा,कल्याण व चेऊल या बंदरांत येत असे. या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीमार्गे देशावर होत होती. याशिवाय पठारावरील लोक देशावरून कोकणात ये-जा करण्यासाठी या घाट रस्त्याचा उपयोग करीत असत. त्याकाळी सोपारा व कल्याण येथून पठारावर माल वहातुक करण्यास नाणेघाट जवळचा व सोयीचा मार्ग होता. नाणेघाटापासून पुढे हा मार्ग देशावर जुन्नर-नगर-नेवासा-पैठण असा होता.

घाटमाथ्यावर पठार असून तेथे एक भव्य कोरीव दगडी रांजण आहे. या रांजणात पूर्वी जकातीची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती तेथील एका स्थानिकाने सांगितली.
नाणेघाट येथील खिंडमार्गातील मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या मूर्ती कोरलेल्या आढळून येतात. भग्न झालेल्या मूर्तीच्या बाजूला त्यांची नावे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या यज्ञांचा व दानांचा शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे. त्यातील बरीचशी अक्षरे नष्ट झालेली दिसून आली.
प्राचीन काळातील खडतर मार्ग म्हणून आज हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. बाजूला उलटे धबधबे आहेत. ते हि पाहण्यासारखे आहेतच. शिवाय खिंडमार्गाजवळील नानीचा अंगठा निसर्गाचा आस्वाद घेण्यासारखा पाँईट आहे. जवळच जीवधन किल्ला आहे.


मार्ग- कराड- सातारा-पुणे-चाकण-मंचर-नारायणगाव-जुन्नर-नाणेघाट 285 कि.मी. एकेरी



प्रदीप रवलेकर, कराड

मंगळवार, २० मे, २०२५

निसर्ग आपल्या आवती भोवती- काजवे  

काजव्यांच्या दुनियेत......

चार-दोन आम्रसरीचे पाऊस झाल्यानंतर हवेमधील उष्णतेची जागा गारवारा घेतो. तेव्हा पावसाळा तोंडावर आला असल्याची जाणीव होते, आणि पाऊले सह्याद्रीच्या वाटा-आडवाटात काजव्यांची झाडे शोधण्यासाठी आंब्याच्या दिशेने वळतात.

नीरव शांतता.... गार वारा.... मिट्ट काळोख..... आणि समोर चमचमणारी काजव्याची झाडे. ...... हे सुंदर दृश्य पाहिल्यानंतर आकाशातील तारांगण पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. मान्सून पूर्व काळ हा काजव्यांच्या प्रणयाराधनेचा काळ.... या कलावधीत लाखोंच्या संख्येने काजवे जवळ पास पाणी असणार्याय झाडावर गोळा होतात. मादी काजव्याच्या तुलनेत नर काजवे जास्त चमकतात. आपल्या प्रकाशाच्या साह्याने ते मादी काजव्याना आकर्षित करीत असतात.

जगभर काजव्यांचा 2000 च्या वर जाती आढळतात. अंडी, अळी व काजवा असे त्याचे जीवनमान. पंख फुटल्यानंतर 10 ते 15 दिवसाचे आयुष्य. मिलना नंतर नर काजवे लगेच मारून जातात तर मादी मातीत वरच्या वर अंडी घालून मरते. अनेक काजवे जोराचा पाऊस किंवा इतर पक्षांची शिकार होतात. सर्व काजवयांची अंडी प्रकाश देत नाहीत मात्र सह्याद्रीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या काही काजव्यांची अंडी, अळी व काजवे प्रकाश देतात.


ल्युसिफेरेज नावाच्या रसायनाचा ऑक्सिजनशी संयोग झाला की काजव्यातून प्रकाश उत्सर्जित होतो. हा प्रकाश थंड असतो. त्यामुळे पिवळा दिसतो. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर काजव्याची अळी प्रामुख्याने मृदू कवच असणाऱ्या गोगलगायी वर तुटून पडतात. हेच त्यांचं मुख्य खाद्य. अळीला पुढे दोन अंटिना व एकदम संवेदनशील स्पर्शिका असतात. त्यामुळे त्यांना त्यांचे भक्ष लवकर पकडता येते. अंडी ते अळी हा खूप मोठ्ठा कालावधी असतो. अळी खूप खावून घेते. पुढे हीच चरबी त्यांना शेवटच्या 10 ते 15 दिवसासाठी वापरता येते.
समागम काळात बहुतेक काजवे काही खात नाहीत. काही मादी काजवे इतर जातीच्या काजव्याना आकर्षित करून खावून टाकतात. मादी काजवे शक्यतो जागा सोडत नाहीत. आपल्या छोट्या प्रकाशाने नर काजव्याना सिग्नल देतात. त्यांचा हा खेळ रात्री उशिरा पर्यंत चाललेला असतो. काजव्याची छोटी दुनिया पण नक्कीच वेड लावणारी आहे. गेले चार पाच वर्षे झाली हा अनुभव मी घेतोय. या वर्षी तुम्ही नक्कीच घ्या........... अलिकडे काजवा महोत्सव भरवून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.
(प्रदीप रवलेकर, कराड)

गुरुवार, १५ मे, २०२५

 

निसर्ग आपल्या आवती-भोवती 

घोस्ट ट्री/ भुतियाचे झाड


पानझडी वनात प्रमुख्याने ही झाडे आढळून येतात. आंबा घाट उतरून गणपती पुळ्याला जाताना दाभोळ सोडले की, घाट चढताना घाटातच उजव्या बाजूला एक मोठ्ठे झाड आहे. उन्हाळ्यात आवर्जून त्याकडे लक्ष जातेच. पानझडी वनात ही झाडे मुबलक प्रमाणात आढळून येतात. ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पाने गळून पडायला सुरुवात होते तर मे, जून महिन्यापासून नवी पालवी फुटते. जेव्हा या झाडांची पाने गळून पडत असतात, त्याचवेळी झाडाच्या खोडावरील पातळ साल (छिलके) निघून जात असतात. त्यामुळे झाडांचा रंग एकदम पांढरा होऊ लागतो. तो एव्हढा पांढरा होतो की, जणू कुणी ती झाडे रंगवली असावीत असे वाटते. अशी पर्णहीन पांढरी फेक झाडे जंगलात इतर झाडापेक्षा खूपच लक्ष वेधून घेतात.

बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण झाडे पांढरी होत असल्याने वनात एखादी नग्न तरुणी उभी असल्याचा भास निर्माण होतो. म्हणून तर या झाडांचा उल्लेख The nude young lady in a forest (द न्यूड यंग लेडी इन फॉरेस्ट) असा आढळून येतो.

या झाडांना नर, मादी व उभयान्वयी अशा तिन्ही प्रकारची फुले येतात. फुलांचा उपयोग कामोत्तेजना वाढवण्यासाठी तर फळांच्या बियांचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. पावसाळ्यात ही झाडे तर झाडाप्रमाणे दिसतात. वेगळेपण लक्षात येत नाही. उन्हाळ्यात मात्र त्यांचे हे उघडे सौंदर्य लक्षात राहण्यासारखेच असते.....



(प्रदीप रवलेकर, कराड,)

रविवार, २१ जुलै, २०२४

 प्रवास वर्णन 

सांधण व्हॅली- निसर्गाचा अदभूत चमत्कार

पावसाळ्यातील ट्रेक मध्ये प्रामुख्याने गड किल्ले यांची भटकंती ठरलेली. या वेळी थोडी वेगळी वाट करून अहमदनगर जिल्ह्यांतील साम्रद गाव गाठले. गाव म्हणजे कसले अजूनही एखादा आदिवासी पाडाच. सह्याद्रीच्या खुशीत बसलेले हे गाव नजीकच्या सांधण दरीमुळे जगाच्या नकाशावर आलेले. भूगर्भातील हालचालीमुळे येथील पठाराला भेग पडली आहे. हीच सांधण व्हॅली. आशिया खंडातील दोन नंबरची सर्वात खोल दरी म्हणून ओळखली जाते. हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे येत असतात. मात्र मला हे ठिकाण पाहण्यासाठी २०२१ सालाची वाट पहावी लागली.

श्रावण महिना नसला तरी सद्या वातावरण खूप आल्हाददायक आहे. याच संधीचा फायदा घेवून सांधण व्हॅलीच्या दर्शनाला आम्ही बाहेर पडलो. दुपारी एक दीड वाजता या ठिकाणी पोहचलो. पावसाळा असूनही उन्हाचा तडाका जाणवत होता. दहा ते पंधरा मिनीटांचे अंतर चालून काही पॉईंट बघून घेतले. येथील निसर्गाचे अद्भुतरम्य रूप पाहण्यासारखे आहे.

उलटे धबधबे व खोल सरळ रेषेतील सह्याद्रीचे कडे डोळ्याचे पारणे फेडतात. जवळच असलेली सांधण व्हॅली वरून पाहताना काळजाचा ठोका चुकतोय की काय? अशी क्षणभर भीती मनात येवून जातेच. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पावसाळ्यात बंद असल्याने दरीतून प्रवास करता आला नाही. मात्र काही अंतरापर्यंत गार्डच्या मदतीने जाता आले. रॅप्लिंग काही अंशी चालू होते. मनसोक्त फोटो सेशन सुरु असताना उन्हाने पूर्णपणे अंगाची लाही लाही झाली होती, परंतु दरीतील थंड पाण्याने थकवा कुठे निघून गेला ते समजलेच नाही. दरीतील थंड वातावरण मनाला ताजे करून गेले. भर दुपारी दरीतील काळोख अनुभवता आला.


सुमारे दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेल्या या दरीतील अनेक धबधबे नजरेत साठवून आम्ही परतीचा मार्ग धरला. रस्त्यातील हॉटेलमध्ये घरगुती जेवण करून भंडारदरा रस्ता धरला. बरोबर नेहमीचीच पत्रकारांची टीम होतीच.
कराड- पुणे- चाकण- राजगुरूनगर- मंचर- नारायणगाव- कोतूळ- भांडारदरा- उडदावणे-साम्रद..350 कि.मी एकेरी
प्रदीप रवलेकर, कराड

शनिवार, २० एप्रिल, २०२४

निसर्ग आपल्या आवती भोवती....... धनेश पक्षी

"छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण करून देण्याचं कारण की अशी एक पक्षाची जोडी आहे जी शेवटपर्यत आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाही. ती जोडी म्हणजे धनेश पक्षाची. याला इंग्रजीत Hornbill म्हणतात. नावाप्रमाणेच आकाराने मोठा व शिंगाप्रमाणे चोच असणारा धनेश हा अतिशय सुंदर दिसतो. भारतात एकूण धनेशच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यातील महाराष्ट्रात चार आढळतात.
जानेवारी ते जून हा याचा प्रजननाचा काळ असतो. मादी उंच जुन्या झाडाच्या डोलीत अंडी घालते. अंडी घातल्यानंतर स्वतःला डोलीत 30 ते 45दिवस कोंडून घेते, स्वतःचे मलमूत्र,तोंडातील लाळ व चिखल यांचा वापर करून सगळी डोली लिपुन टाकते. फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवते. हे घरट बांधण्यासाठी नर पक्षी तिला चिखलाचे गोळे चोचीने पुरवतो. मादी डोलीत बंद झाल्यानंतर अन्न पुरवण्याचे काम नर करतो. पिल्लांना पंख फुटे पर्यंत नराला सर्वांच्या अन्नाची जबाबदारी घ्यावी लागते, त्यामुळे नर पुरता दमून जातो.- मादीही कृश होते. पंख फुटल्यावर मादी चोचीने डोली फोडून बाहेर पडते......

बहुतेक ठिकाणी हे पक्षी जोडीनेच फिरताना दिसून येथील....

या पक्षांची एकदा जमलेली जोडी शेवट पर्यंत कायम राहते. ते जीवनभर कायम एकत्रित राहतात. एक मरण पावला की त्याच्या विरहाने काही दिवसात दुसराही मरतो. म्हणूनच छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण होते.

आमच्या लहानपणी गावाकडे राखाडी धनेश अशा मोठ्या संख्येने दिसून यायचे...
मी लहानपणी असले खूप पक्षी गावाकडे पहिले आहेत, लिंबाच्या झाडावर लिंबोळ्या खाण्यासाठी यायचे....आता मात्र ते कुठेच दिसत नाहीत. खूपच दुर्मिळ झाले आहेत.....

(प्रदीप रवलेकर,कराड)

  मुलांच्यासाठी अभ्यास, मस्ती, खेळ व भरपूर वाचनाचा खजिना उपलब्ध मुलांसाठी फ्री वाचन साहित्य उपलब्ध    लिंक वर क्लिक करा आणि पुस्तक वाचनाचा आ...