'Freeedu: "एक नवी शैक्षणिक सुरुवात....!"

मंगळवार, २० मे, २०२५

निसर्ग आपल्या आवती भोवती- काजवे  

काजव्यांच्या दुनियेत......

चार-दोन आम्रसरीचे पाऊस झाल्यानंतर हवेमधील उष्णतेची जागा गारवारा घेतो. तेव्हा पावसाळा तोंडावर आला असल्याची जाणीव होते, आणि पाऊले सह्याद्रीच्या वाटा-आडवाटात काजव्यांची झाडे शोधण्यासाठी आंब्याच्या दिशेने वळतात.

नीरव शांतता.... गार वारा.... मिट्ट काळोख..... आणि समोर चमचमणारी काजव्याची झाडे. ...... हे सुंदर दृश्य पाहिल्यानंतर आकाशातील तारांगण पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. मान्सून पूर्व काळ हा काजव्यांच्या प्रणयाराधनेचा काळ.... या कलावधीत लाखोंच्या संख्येने काजवे जवळ पास पाणी असणार्याय झाडावर गोळा होतात. मादी काजव्याच्या तुलनेत नर काजवे जास्त चमकतात. आपल्या प्रकाशाच्या साह्याने ते मादी काजव्याना आकर्षित करीत असतात.

जगभर काजव्यांचा 2000 च्या वर जाती आढळतात. अंडी, अळी व काजवा असे त्याचे जीवनमान. पंख फुटल्यानंतर 10 ते 15 दिवसाचे आयुष्य. मिलना नंतर नर काजवे लगेच मारून जातात तर मादी मातीत वरच्या वर अंडी घालून मरते. अनेक काजवे जोराचा पाऊस किंवा इतर पक्षांची शिकार होतात. सर्व काजवयांची अंडी प्रकाश देत नाहीत मात्र सह्याद्रीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या काही काजव्यांची अंडी, अळी व काजवे प्रकाश देतात.


ल्युसिफेरेज नावाच्या रसायनाचा ऑक्सिजनशी संयोग झाला की काजव्यातून प्रकाश उत्सर्जित होतो. हा प्रकाश थंड असतो. त्यामुळे पिवळा दिसतो. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर काजव्याची अळी प्रामुख्याने मृदू कवच असणाऱ्या गोगलगायी वर तुटून पडतात. हेच त्यांचं मुख्य खाद्य. अळीला पुढे दोन अंटिना व एकदम संवेदनशील स्पर्शिका असतात. त्यामुळे त्यांना त्यांचे भक्ष लवकर पकडता येते. अंडी ते अळी हा खूप मोठ्ठा कालावधी असतो. अळी खूप खावून घेते. पुढे हीच चरबी त्यांना शेवटच्या 10 ते 15 दिवसासाठी वापरता येते.
समागम काळात बहुतेक काजवे काही खात नाहीत. काही मादी काजवे इतर जातीच्या काजव्याना आकर्षित करून खावून टाकतात. मादी काजवे शक्यतो जागा सोडत नाहीत. आपल्या छोट्या प्रकाशाने नर काजव्याना सिग्नल देतात. त्यांचा हा खेळ रात्री उशिरा पर्यंत चाललेला असतो. काजव्याची छोटी दुनिया पण नक्कीच वेड लावणारी आहे. गेले चार पाच वर्षे झाली हा अनुभव मी घेतोय. या वर्षी तुम्ही नक्कीच घ्या........... अलिकडे काजवा महोत्सव भरवून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.
(प्रदीप रवलेकर, कराड)

गुरुवार, १५ मे, २०२५

 

निसर्ग आपल्या आवती-भोवती 

घोस्ट ट्री/ भुतियाचे झाड


पानझडी वनात प्रमुख्याने ही झाडे आढळून येतात. आंबा घाट उतरून गणपती पुळ्याला जाताना दाभोळ सोडले की, घाट चढताना घाटातच उजव्या बाजूला एक मोठ्ठे झाड आहे. उन्हाळ्यात आवर्जून त्याकडे लक्ष जातेच. पानझडी वनात ही झाडे मुबलक प्रमाणात आढळून येतात. ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पाने गळून पडायला सुरुवात होते तर मे, जून महिन्यापासून नवी पालवी फुटते. जेव्हा या झाडांची पाने गळून पडत असतात, त्याचवेळी झाडाच्या खोडावरील पातळ साल (छिलके) निघून जात असतात. त्यामुळे झाडांचा रंग एकदम पांढरा होऊ लागतो. तो एव्हढा पांढरा होतो की, जणू कुणी ती झाडे रंगवली असावीत असे वाटते. अशी पर्णहीन पांढरी फेक झाडे जंगलात इतर झाडापेक्षा खूपच लक्ष वेधून घेतात.

बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण झाडे पांढरी होत असल्याने वनात एखादी नग्न तरुणी उभी असल्याचा भास निर्माण होतो. म्हणून तर या झाडांचा उल्लेख The nude young lady in a forest (द न्यूड यंग लेडी इन फॉरेस्ट) असा आढळून येतो.

या झाडांना नर, मादी व उभयान्वयी अशा तिन्ही प्रकारची फुले येतात. फुलांचा उपयोग कामोत्तेजना वाढवण्यासाठी तर फळांच्या बियांचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. पावसाळ्यात ही झाडे तर झाडाप्रमाणे दिसतात. वेगळेपण लक्षात येत नाही. उन्हाळ्यात मात्र त्यांचे हे उघडे सौंदर्य लक्षात राहण्यासारखेच असते.....



(प्रदीप रवलेकर, कराड,)

रविवार, २१ जुलै, २०२४

 प्रवास वर्णन 

सांधण व्हॅली- निसर्गाचा अदभूत चमत्कार

पावसाळ्यातील ट्रेक मध्ये प्रामुख्याने गड किल्ले यांची भटकंती ठरलेली. या वेळी थोडी वेगळी वाट करून अहमदनगर जिल्ह्यांतील साम्रद गाव गाठले. गाव म्हणजे कसले अजूनही एखादा आदिवासी पाडाच. सह्याद्रीच्या खुशीत बसलेले हे गाव नजीकच्या सांधण दरीमुळे जगाच्या नकाशावर आलेले. भूगर्भातील हालचालीमुळे येथील पठाराला भेग पडली आहे. हीच सांधण व्हॅली. आशिया खंडातील दोन नंबरची सर्वात खोल दरी म्हणून ओळखली जाते. हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे येत असतात. मात्र मला हे ठिकाण पाहण्यासाठी २०२१ सालाची वाट पहावी लागली.

श्रावण महिना नसला तरी सद्या वातावरण खूप आल्हाददायक आहे. याच संधीचा फायदा घेवून सांधण व्हॅलीच्या दर्शनाला आम्ही बाहेर पडलो. दुपारी एक दीड वाजता या ठिकाणी पोहचलो. पावसाळा असूनही उन्हाचा तडाका जाणवत होता. दहा ते पंधरा मिनीटांचे अंतर चालून काही पॉईंट बघून घेतले. येथील निसर्गाचे अद्भुतरम्य रूप पाहण्यासारखे आहे.

उलटे धबधबे व खोल सरळ रेषेतील सह्याद्रीचे कडे डोळ्याचे पारणे फेडतात. जवळच असलेली सांधण व्हॅली वरून पाहताना काळजाचा ठोका चुकतोय की काय? अशी क्षणभर भीती मनात येवून जातेच. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पावसाळ्यात बंद असल्याने दरीतून प्रवास करता आला नाही. मात्र काही अंतरापर्यंत गार्डच्या मदतीने जाता आले. रॅप्लिंग काही अंशी चालू होते. मनसोक्त फोटो सेशन सुरु असताना उन्हाने पूर्णपणे अंगाची लाही लाही झाली होती, परंतु दरीतील थंड पाण्याने थकवा कुठे निघून गेला ते समजलेच नाही. दरीतील थंड वातावरण मनाला ताजे करून गेले. भर दुपारी दरीतील काळोख अनुभवता आला.


सुमारे दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेल्या या दरीतील अनेक धबधबे नजरेत साठवून आम्ही परतीचा मार्ग धरला. रस्त्यातील हॉटेलमध्ये घरगुती जेवण करून भंडारदरा रस्ता धरला. बरोबर नेहमीचीच पत्रकारांची टीम होतीच.
कराड- पुणे- चाकण- राजगुरूनगर- मंचर- नारायणगाव- कोतूळ- भांडारदरा- उडदावणे-साम्रद..350 कि.मी एकेरी
प्रदीप रवलेकर, कराड

शनिवार, २० एप्रिल, २०२४

निसर्ग आपल्या आवती भोवती....... धनेश पक्षी

"छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण करून देण्याचं कारण की अशी एक पक्षाची जोडी आहे जी शेवटपर्यत आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाही. ती जोडी म्हणजे धनेश पक्षाची. याला इंग्रजीत Hornbill म्हणतात. नावाप्रमाणेच आकाराने मोठा व शिंगाप्रमाणे चोच असणारा धनेश हा अतिशय सुंदर दिसतो. भारतात एकूण धनेशच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यातील महाराष्ट्रात चार आढळतात.
जानेवारी ते जून हा याचा प्रजननाचा काळ असतो. मादी उंच जुन्या झाडाच्या डोलीत अंडी घालते. अंडी घातल्यानंतर स्वतःला डोलीत 30 ते 45दिवस कोंडून घेते, स्वतःचे मलमूत्र,तोंडातील लाळ व चिखल यांचा वापर करून सगळी डोली लिपुन टाकते. फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवते. हे घरट बांधण्यासाठी नर पक्षी तिला चिखलाचे गोळे चोचीने पुरवतो. मादी डोलीत बंद झाल्यानंतर अन्न पुरवण्याचे काम नर करतो. पिल्लांना पंख फुटे पर्यंत नराला सर्वांच्या अन्नाची जबाबदारी घ्यावी लागते, त्यामुळे नर पुरता दमून जातो.- मादीही कृश होते. पंख फुटल्यावर मादी चोचीने डोली फोडून बाहेर पडते......

बहुतेक ठिकाणी हे पक्षी जोडीनेच फिरताना दिसून येथील....

या पक्षांची एकदा जमलेली जोडी शेवट पर्यंत कायम राहते. ते जीवनभर कायम एकत्रित राहतात. एक मरण पावला की त्याच्या विरहाने काही दिवसात दुसराही मरतो. म्हणूनच छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण होते.

आमच्या लहानपणी गावाकडे राखाडी धनेश अशा मोठ्या संख्येने दिसून यायचे...
मी लहानपणी असले खूप पक्षी गावाकडे पहिले आहेत, लिंबाच्या झाडावर लिंबोळ्या खाण्यासाठी यायचे....आता मात्र ते कुठेच दिसत नाहीत. खूपच दुर्मिळ झाले आहेत.....

(प्रदीप रवलेकर,कराड)

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

 

निसर्ग आपल्या आवती-भोवती पावसाचे गाव.....पाथरपुंज

भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण म्हणून चेरापुंजी ओळखले जाते. अभ्यासाला असल्याने अनेकांना चेरापुंजीची ओळख. परंतु गेल्या काही वर्षीपासून पाटण तालुक्यातील पाथरपुंज या ठिकाणी देशातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आणि अचानक गाव प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रदेशनुसार पावसाचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे ठराविक वर्षीच्या सततच्या पावसाच्या सरासरी प्रमाणावर तेथील पर्जन्यमान निश्चित केले जाते. आज ना उद्या हे ठिकाण जास्त पावसाचे म्हणून नावारूपाला येईल.


या वर्षी ऑगस्ट अखेर चेरापुंजीत ४,७३० मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर पाथरपुंज येथे ५,७८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी देशाच्या हवामान शास्त्रात पाथरपुंज गावाची ओळख निर्माण झाली आहे.
मला पाऊस आवडतो कारण तो माझे डोळ्यातील अश्रू कुणाला दिसून देत नाही म्हणून. पावसात आणि पावसाळ्यात मुक्त भटकणे हा आमचा छंद. त्यातच आपल्या जवळचे ठिकाण म्हणून नेहमी पावसाळ्यात अंबोलीची ट्रीप ठरलेली. व्यावसायीकरण झाल्याने पर्यटकांचा ओढा अंबोलीकडे जास्तच राहिला आहे. म्हणून गेल्या वर्षी वाट वेगळी करून पाथरपुंज गाठले. तसे आम्ही सह्याद्रीतील नेहमीच नव-नवीन ठिकाणे शोधत असतो. त्यातीलच हे पाथरपुंज.

सर्व बाजूनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले पाथरपुंज गाव म्हणजे आदिवासी पाडाच. मळे, कोळणे ही जुळी गावे शेजारी. त्यानंतर १५ ते २० कि.मीच्या परिसरात एकही गाव नाही, फक्त दाटझाडी आणि डोंगर दऱ्या. ना इंटरनेट ना बारमाही वीज. डोंगरातून थेट घरात येणारे झ-यांचे मिनरल water. रस्ता तर फक्त नावालाच. तरीही समृद्ध मानवी जीवन.


या वर्षीचा पाऊस आणि तो ही देशातील सर्वात जास्त पर्जन्य असलेल्या गावात अनुभवता आला. अखंड ढगातून सरळ अंगावर येणाऱ्या पाऊसधारा आणि जवळचे सुद्धा नजरेस पडणार नाही असे दाट धुके. नाचणीची आणि भाताची शेती. सर्वत्र अपार सौंदर्याची खाण असलेला प्रदेश म्हणून डोळ्यात साठवावा तेवढा कमीच. गेल्या वर्षी तर सलग तीन महिने पाऊस होता येथे. त्यातील एक महिना तर आभाळ फाटल्यागत. त्या महिन्यात माणसांना व जनावरांना घराच्या बाहेर सुद्धा पडता आले नाही. घरात जे होते ते खाऊन महिना काढला लोकांनी. चारी बाजूंंनी डोंगर असल्याने आणि सलग महिनाभर धो-धो कोसळणारा पाऊस त्यातच वीज गेलेली अशा वेळी येथील लोकांनी कसा महिना काढला असेल ..? फक्त कल्पनाच केली तरी अंगावर काटा उभा राहतो. मरणप्राय पाऊस अनुभवला इथल्या लोकांनी आणि नेमकी महाराष्ट्रात पूर स्थिती सुरु होती. सगळीकडे पाणीच पाणी........आणि कुणाचा कुणाशी संपर्क नाही.

आज जास्त पाऊस म्हणून या गावांचे नाव होतेय पण, लोकांनी जिवंतपणी मरण अनुभवले आहे. आम्ही पाऊस शोधण्यासाठी तिथपर्यंत पोहचलो तर तेथील लोकांना पाऊस म्हणजे अंगावर भीतीचे शहारे आणणारी काळरात्र वाटते.
सदरची गावे चांदोली व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने त्यांचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्यात आलेले आहे.लवकरच ही तिन्ही गावे उठतील. आणि हा भाग कायमचा दुर्गम होवून जाईल. ना पावसाच्या आठवणी.....ना पाऊस अनुभवण्याची मजा.


(प्रदीप रवलेकर, कराड)

  मुलांच्यासाठी अभ्यास, मस्ती, खेळ व भरपूर वाचनाचा खजिना उपलब्ध मुलांसाठी फ्री वाचन साहित्य उपलब्ध    लिंक वर क्लिक करा आणि पुस्तक वाचनाचा आ...