शनिवार, २० एप्रिल, २०२४

निसर्ग आपल्या आवती भोवती....... धनेश पक्षी

"छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण करून देण्याचं कारण की अशी एक पक्षाची जोडी आहे जी शेवटपर्यत आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाही. ती जोडी म्हणजे धनेश पक्षाची. याला इंग्रजीत Hornbill म्हणतात. नावाप्रमाणेच आकाराने मोठा व शिंगाप्रमाणे चोच असणारा धनेश हा अतिशय सुंदर दिसतो. भारतात एकूण धनेशच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यातील महाराष्ट्रात चार आढळतात.
जानेवारी ते जून हा याचा प्रजननाचा काळ असतो. मादी उंच जुन्या झाडाच्या डोलीत अंडी घालते. अंडी घातल्यानंतर स्वतःला डोलीत 30 ते 45दिवस कोंडून घेते, स्वतःचे मलमूत्र,तोंडातील लाळ व चिखल यांचा वापर करून सगळी डोली लिपुन टाकते. फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवते. हे घरट बांधण्यासाठी नर पक्षी तिला चिखलाचे गोळे चोचीने पुरवतो. मादी डोलीत बंद झाल्यानंतर अन्न पुरवण्याचे काम नर करतो. पिल्लांना पंख फुटे पर्यंत नराला सर्वांच्या अन्नाची जबाबदारी घ्यावी लागते, त्यामुळे नर पुरता दमून जातो.- मादीही कृश होते. पंख फुटल्यावर मादी चोचीने डोली फोडून बाहेर पडते......

बहुतेक ठिकाणी हे पक्षी जोडीनेच फिरताना दिसून येथील....

या पक्षांची एकदा जमलेली जोडी शेवट पर्यंत कायम राहते. ते जीवनभर कायम एकत्रित राहतात. एक मरण पावला की त्याच्या विरहाने काही दिवसात दुसराही मरतो. म्हणूनच छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण होते.

आमच्या लहानपणी गावाकडे राखाडी धनेश अशा मोठ्या संख्येने दिसून यायचे...
मी लहानपणी असले खूप पक्षी गावाकडे पहिले आहेत, लिंबाच्या झाडावर लिंबोळ्या खाण्यासाठी यायचे....आता मात्र ते कुठेच दिसत नाहीत. खूपच दुर्मिळ झाले आहेत.....

(प्रदीप रवलेकर,कराड)